बुधवार, ३१ ऑगस्ट, २०१६

*स्वामी वरदानंद भारती पुण्यतिथी - एक चिॅतन !*

*स्वामी वरदानंद भारती पुण्यतिथी - एक चिॅतन !*

आमच्या पंढरीतलेच आदरणीय अप्पा उपाख्य पूर्वाश्रमीचे अनंतराव दामोदरराव आठवले जे पुढे संन्यासोत्तर स्वामी वरदानंद भारती झाले ! अप्पांचा, काल पुण्यस्मरणाचा दिवस होता ! योगशास्त्रात ज्या निर्विकल्प व सविकल्प समाधी अवस्थेचे वर्णन केलंय, त्या निर्विकल्प समाधी अवस्थेस प्राप्त झालेला एक महापुरुष म्हणजे आदरणीय अप्पा !

एथ वडील जे आचरिती
तया नाम धर्म ठेविती
येर तेंचि अनुष्ठिती
सामान्य सकळ !

कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानोबारायांच्या ह्या सिद्धांताप्रमाणे अप्पांचे पूर्ण जीवनच आपल्या सद्गुरुंच्या अर्थात संतकवी दासगणु महाराजांच्या मार्गदर्शनातच व्यतीत झालं ! दासगणुमहाराजांसारखा विद्वान व संतकवी सद्गुरु लाभलेल्या मनुष्यांस बालपणीच कृष्णभक्तीचा लळा लागला व वयाच्या तेवीस-चोविसाव्या वर्षीच अप्पांनी "श्रीकृष्ण कथामृत" हा पुरुषोत्तम श्रीकृष्णाच्या चरित्रावरचा ओवीबद्ध ग्रंथ रचला ! २००७ ह्या वर्षात हा ग्रंथ सिंबायोसिस महाविद्यालयात असताना माझ्या वाचण्यांत आला. ह्या ग्रंथातून त्या वयात अप्पांची प्रतिभा ही किती संपन्न होती हे दिसून येते ! अर्थात योग्यतेला वयाची मर्यादा नसतेच तरीपण हा ग्रंथ श्रीकृष्णभक्तांसाठी अनुपम आहे. उपमालंकाराने नटलेला हा ग्रंथ कधीकधी डोळ्यात चटकन पाणी आणतो.

हा ग्रंथ ऐकायचा तर आमचे गुरुवर्य भागवताचार्य श्री. वा ना उत्पातांच्या श्रीमुखातून श्रीमद्भागवत आख्यानात ! अर्थात वा. ना. महाराज त्यांचे एक प्रिय शिष्य असल्यामुळे त्यांच्या मुखातून श्रीकृष्ण कथामृत ऐकणं हा एक वेगळाच अनुभव आहे. अप्पांच्या ग्रंथसंपदेची ओळख आम्हांस आदरणीय वा. ना. महाराजांमुळेच झाली, हे वेगळं सांगायला नको.

*अप्पांची विलक्षण ग्रंथसंपदा*
श्रीकृष्ण कथामृत, भगवद्गीतेवरच्या प्रत्येक अध्यायावरचं अप्पांचे भाष्य, प्रस्थानत्रयी अशा ब्रह्मसूत्रांवरचं व उपनिषदांवरचंही अप्पांचं भाष्य ही त्यांच्या अलौकिक व प्रखर बुद्धिमत्तेचा व विद्वत्तेचा कळस आहे.

*मनुस्मृतीवरचं अप्पांचे भाष्य*
ज्यांना मनुस्मृती हा ग्रंथ व्यवस्थित समजून घ्यायचा असेल त्यांनी अप्पांचे सार्थ मनुस्मृती भाष्य वाचायलाच हवे ! अप्पांच्या प्रत्युत्पन्न मतीचा आविष्कार ह्या ग्रंथात आपणांस पहावयाला मिळतो. जिज्ञासूंनी हा ग्रंथ अवश्य वाचावा ही विनंती ! ग्रंथाचा विस्तार मोठा असली तरी ग्रंथ निश्चितच वाचनीय व चिंतनीय !

*महाभारताचे वास्तव दर्शन - आक्षेपांच्या संदर्भात*
अप्पांच्या एकुणच व्यक्तिमत्वावर कळस चढविणारा ग्रंथ म्हणजे महाभारताचे वास्तव दर्शन - आक्षेपांच्या संदर्भात ! ह्या ग्रंथात अप्पांनी महाभारतावरच्या आक्षेपांस जे सप्रमाण व साधार उत्तर दिलंय ते पाहिलं की मन थक्क होते ! इरावती बाई कर्वेंपासून ते आनंद साधले व इतर अनेक आक्षेपकांचे नाव घेऊन सप्रमाण व साधार खंडण करणारे अप्पा हे विद्वत्तेचा कळस होते ! त्यांनी कर्णाच्या उदात्तीकरणाला केलेला विरोध, जो त्यांनी सोबत नावाच्या तत्कालीन मासिकातही लेखरुपाने प्रकाशित केला होता तोही वाचनीय आहे. सोबत मध्ये कर्णावर अप्पांचा लेख आलेला आम्ही वाचलाय. सोबत हे सत्तर व ऐंशीच्या दशकातलं ग. वा. बेहरेंचे एक अभ्यासपूर्ण प्रकाशन होते ! ह्या सोबत मध्ये तत्कालीन अनेक विद्वानांचे अतिशय अभ्यासपूर्ण व रोखठोक भूमिका मांडणारे लेख आपणांस वाचावयांस मिळतील. ते अवश्य वाचावेत.

*ज्ञानेश्वरीवर समश्लोकी औवीबद्ध भाष्य करणारे अप्पा !*
ज्ञानेश्वरी हा मराठी साहित्याचा एक मेरुमणी आहे. गेली सात शतके ग्रंथराजाने मराठी मनांस जी भूरळ घातलीय ती काही केल्या कमी तर होणार नाहीच नाही. ह्या ज्ञानेश्वरीवर प्रत्येक ओवीवर ओवीरुपातच भाष्य करणारे अप्पा हे काय प्रतिभा संपन्न होते हे वेगळं सांगायची आवश्यकता नाही. तत्कालीन ज्ञानेश्वरीवरील एक आदरणीय भाष्यकार गुरुवर्य धुंडा महाराज देगलुरकरांची त्यांस प्रस्तावना आहे. देगलुरकर हे नाव ज्ञानेश्वरीशी इतकं जोडलं गेलंय की विचारायांसच नको. ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओवीवर तशाच ओव्या रचणं हे येरागबाळाचे काम नोव्हे !

*आणखी काही ग्रंथाचा परिचय*
अप्पांची ग्रंथसंपदा ही विपुल आहे. *यक्षप्रश्न* ह्या ग्रंथात त्यांनी महाभारतातल्या यक्ष-युधिष्ठिर संवादावर केलेलं भाष्य हे निश्चितच चिॅतनीय आहे.

*वाटा आपल्या हिताच्या* - अप्पांचा एक महत्वपूर्ण ग्रंथ
हिंदुधर्मावरच्या आक्षेपांचं निवारण करणारा हा प्रश्नोत्तररुपी ग्रंथ ज्यात अनेक विषयांवरचे प्रश्न व त्यांस अप्पांनी दिलेलं समर्पक उत्तरे असा हा ग्रंथ ! सकाळचे संस्थापक नानासाहेब परुळेकरांच्या एका मासिकांत हा ग्रंथसंवाद छापून आलेला आम्ही वाचलाय. अनेक शंकाकुशंकाचे निवारण करणारा हा ग्रंथ प्रत्येक हिॅदुमात्रांस आवश्यक आहे.

*श्रीकृष्ण चरित्र*
ह्या ग्रंथात अप्पांनी भगवान श्रीकृष्णावरच्या अनेक आक्षेपांचे साधार नि सप्रमाण खंडण केलंय. श्रीकृष्णावर अनेकांनी अनेक आक्षेप अकारण घेतले आहेत. अप्पांनी ह्या ग्रंथात मांडलेले कृष्ण चरित्र हे निश्चितच अभ्यसनीय आहे.

*समर्थ चरित्र प्रवचन !*
अप्पांची अनेक प्रवचने व कीर्तने आज ध्वनिमुद्रित स्वरुपात व चलतचित्र स्वरुपात उपलब्ध आहेत. Samarthramdas400.in ह्या संकेतस्थळांवर त्यांचे समर्थ चरित्रावरचे अडीच तासाचे जे प्रवचन उपलब्ध आहे, ते पुन्हा पुन्हा ऐकण्याचा मोह मनुष्यांस झाल्याशिवाय राहत नाही.

*वारकरी पंथ व रामदासी पंथांचे समन्वय साधणारे अप्पा !*
जगद्गुरु तुकोबाराय व समर्थ रामदास ह्या दोन संतश्रेष्ठांच्या जीवन तत्वज्ञानाचे समन्वय साधणारे अप्पा हे तत्कालीन विद्वानांमध्ये अग्रणी होते. हा प्रयत्न त्यांनी अनेक दशकांपूर्वी केला होता. कारण वारकरी पंथ व रामदासी पंथांत हेतुपुररस्सर भेद निर्माण करणारे काही नालायक लोकही ह्या महाराष्ट्रात त्याकाळीही होते व आजही ते आहेत हे खेदांने म्हणावंसं वाटतं. अप्पांनी हा समन्वयाचा एक स्तुत्य
प्रयत्न त्यावेळी केला होता हे एक नवलपूर्ण होते.  आज तोच प्रयत्न आदरणीय स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज(पूर्वाश्रमीचे आदरणीय
किशोरजी व्यास) करताहेत हेही नसे थोडके !

*स्तोत्र रचना*
अप्पांचे संस्कृत भाषेवरचे असामान्य प्रभूत्व हे त्यांच्या प्रस्थानत्रयीवरच्या भाष्यात तर आपणांस दिसून येतंच. पण तरीही त्यांनी रचलेली स्तोत्रे ह्यावरून त्यांची अनुपम भक्ती व ह्या गीर्वाणवाणीवरचे प्रभूत्व दिसतं. जगत्जननी रुख्मिणी मातेवर रचलेले त्यांचे रुक्मिणी अष्टक हे आचार्यांच्या पांडुरंगाष्टकप्रमाणेच गेय व भक्तीरसाने ओथंबलेले आहे. आमच्या पंढरीत रुक्मिणी सभागृहात ते लावलेलं आहे.

*अप्पांची राष्ट्रनिष्ठा*
अप्पांनी रचलेले पोवाडे व फटके हे त्यांच्या राष्ट्रभक्तीचे द्योतक आहेत. अप्पा हे त्या न्यायाने एक क्रांतिकारकच होते असं म्हटल्यांस वावगं ठरणार नाही. ते हिॅदुह्रदयसम्राट तात्याराव सावरकरांवर प्रेम करणारे होते.

*एक आयुर्वेदाचार्य*
अप्पा हे व्यवसायाने वैद्य होते. त्यांचा जन्म व बालपण जरी पंढरीत गेलेलं असलं तरी त्यांच्या जीवनाचा बराचसा भाग हा पुण्यातच
व्यतीत झाला होता. पुण्यातल्याच एका आयुर्वेद महाविद्यालयात ते प्राचार्यपदावरही आरुढ झाले होते. आयुर्वेदाचं त्यांचं ज्ञान अफाट होते.

*तेजाचं चांदणं - अप्पांचे चरित्र*
अप्पांच्या समाधीनंतर त्यांच्या अधिकारी शिष्यांनी त्यांचे चरित्र प्रकाशित केलं होते. सिंबायोसिस मध्ये असताना आमच्या ते वाचण्यांत आले होते. ह्या चरित्रांत नावाप्रमाणेच अप्पांचे जीवन हे एका तेजाचे चांदणं हे सार्थ होते ह्याचा प्रत्यय येतो.

अप्पांचा शिष्यपरिवार महाराष्ट्रात सुविख्यात आहे.

ज्येष्ठ अभ्यासक,वक्ते,राष्ट्रविचार प्रसारक व ख्यातनाम लेखक डाॅ. सच्चिदानंद शेवडे, आदरणीय कल्याणी नामजोशी,भागवताचार्य वा. ना. उत्पात,त्यांचे पुत्रद्वय वैकुठंवासी चंद्रशेखर महाराज अाठवले व कंपनी सेक्रेटरी म्हणून विख्यात असे महेश आठवले हा महाराष्ट्रातला एक अधिकारी व अभ्यासु वर्ग अप्पांस शिष्य म्हणून लाभलाय.

*अप्पांची समाधी*
अप्पांनी काल म्हणजे श्रावण कृष्ण त्रयोदशीस समाधी घेतली. योगमार्गाने टाळूतून प्राणत्याग करून ते ब्रह्नलीन झाले. त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र प्रणाम !!!
भवदीय,

*तुकाराम चिंचणीकर*
८८८८८३८८६३

वै.सदगुरु दादा महाराज चातुर्मास्ये पुण्यस्मरण!

आज महान श्रीविठ्ठलभक्त सद्गुरु विठोबा दादामहाराज चातुर्मास्ये यांची २२५ वी पुण्यतिथी.....

निमित्त लेखप्रपंच
        इ.स.सतराशे मध्ये   पू.दादामहाराजांचा जन्म श्रीक्षेत्र अनवा ता.भोकरदन जि.जालना येथे झाला .. सद्गुरु दादामहाराज हे संत भानुदास महाराजांचे अवतार होते.

संतकवी दासगणू महाराज लिहतात .

" उपरिर्दिष्ठ संतापरी । तु सांप्रत या भूवरी । तु पूर्वजन्मामाझारी । भानुदास होतास ।। "

पू.महाराजांचे शिक्षण जवळच्या वढोद गावी श्री.मुरलीधर कुलकर्णी यांच्या कडे झाले..संस्कृत अध्ययन ,व्यवहारलेखन ,श्रीमद्भागवत ,श्रीगीता यांचेही अध्ययन झाले..

' पंढरीची वारी आहे माझे घरी । अणिक न करी तिर्थव्रत '

या उक्तिप्रमाणे पंढरीची वारीचा नेम सुरु केला . बारा वर्ष वारी नेम झाल्यावर श्रीपांडूरंगानीच त्यांना सहकुटूंब चातुर्मास्य वारी करण्यात सुचविलं आणि कीर्तनसेवाही करण्यास सांगितलं.श्रीक्षेत्र पंढरपूरला आल्यावर १३ दिवस अनुष्ठान केले..

' जन्मभूमिस्थाना आज्ञा दिली हरी । चातुर्मास्य वारी निरोपिली ।।'

माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव ! आपणचि देव होय गुरु !!

हि गुर्वाज्ञा मान्य करुन ते पुढे चातुर्मासाला येऊ लागले , पांडुरंगासमोर गरुडखांबाजवळ कीर्तनं करु लागले.कीर्तनास खूप गर्दी जमू लागली आणि काही लोक कीर्तनात विघ्नं आणू लागले. असं ही काही दिवस गेले ...शेवटी पू.महाराजांनी पांडुरंगाचा निरोप घेतला आणि वाळवंटात येऊन कीर्तन करु लागले .असेही काही दिवस गेले पण तिथे पावसाचा आणि नदीच्या पाण्याचा त्रास होऊ लागला. श्रोते भर पावसातसुध्दा कशाचीही पर्वा न करता निर्धाराने बसत असत. कीर्तनकार तर देहभान विसरले होतेच. पण भक्तसाह्य श्री पांडुरंगाला हे सहन होईना .. त्यांनी  शिवरामपंत खाजगीवाले ( पेशव्यांचे सावकार ) यांना स्वप्नात गाठलं अन् सांगितलं 'शिवरामपंत , पू.दादामहाराजांना कीर्तनास त्रास होतोय. त्यांच्या साठी एखाद स्थळ बघा आणि नियम चालवा.. शिवराम पंतांनी लगेच मोठा वाडा बांधला अन् कीर्तनसेवा सुरु झाली अन् सुरुय.....

'चातुर्मास्ये अभिधान प्राप्ती'

       कीर्तनाची कीर्ती सर्वत्र पसरतच होती .विठ्ठलभक्त अनवेकर या नावानेच सगळेजन त्यांना ओळखत होते.एका आषाढीला पंढरपूरी चिक्कार गर्दी भरली होती .अशातचं कुठूनशी एक वृध्द आजीबाई म्हातारी पण वारीला आली होती .देवळात दर्शनाला गेली .हातात एक नारळ घेऊन .पण गर्दीत काही तिला प्रवेश मिळाला नाही ,ती पश्चात्तप करु लागली ,' मी दुर्देवी ,मला कुठलं दर्शन व्हायला ? आयुष्यात अनेक दोष घडले काही सत्कार्य केले नाही त्यामुळेचं देव दर्शन देत नसेल. अशा खिन्न अंत:करणानं बसली ,एक वारकरी जवळ आला आणि म्हणाला,'म्हातारे, इथं तुला देव भेटायचा नाही . अग संत देवापेक्षाही श्रेष्ठ असतात.पंढरपूरात असाचं एक देवाचा लाडका भक्त आहे ,तु तिथं जा ! म्हातारी पू.दादामहाराजांच्या दर्शना करिता निघाली पोहचली तर तिथंही गर्दी होती , तिथं ही दर्शन झालं नाही .. पुन्हा ती मंदिरात आली तेव्हा तिनं दर्शन घेतलं आणि देवाच्या कमरेजवळ नारळ ठेवला आणि निघून गेली..काही वेळाने सेवेधारी मंडळींनी नारळ काढायचा प्रयत्न केला पण व्यर्थ गेला, ...त्या रात्री पुजा-यांना दृष्टांत झाला हा नारळ तुमचाही नाही अन् माझाही नाही हा नारळ माझ्या लाडक्या विठोबा दादा चातुर्मास्ये यांचा आहे ,त्यांच्या शिवाय कोणाला मिळणार नाही त्यांना घेऊन या. पुजारी शोध घेत वाड्यात आले आणि दादांना मंदिरात घेऊन आले .दादांनी पदर पसरला आणि विनविले , ' देवा ! तोच मी असेल तर कृपा करा ' आणि काय नवल ! नारळ चटकन त्यांच्या पदरात पडला . लोक आणि पुजारी चकीत झाले..
मोठ्याने गर्जना झाली . " सद्गुरु विठोबा दादामहाराज की जय "
सर्वत्र तेव्हापासून विठोबा दादा चातुर्मास्ये हे नाव सर्वतोमुखी झाले .. चातुर्मास  झाल्यानंतर गावोंगावो 'पिटु भक्तीचा डागोंरा' म्हणत मराठवाडा, विर्दभ संपूर्ण महाराष्ट्रभर तसेच मध्यप्रदेश आदी भागात भागवत धर्माचा प्रचार-प्रसार केला ...
पुढे पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांनी आपले महेश्वर नगरीस त्यांना गौरवानं नेलं तिथंही खूप मोठा उत्सव झाला.आर्याकार महाराष्ट्रकवि मोरोंपंत यांचा आणि पू.महाराजांचा स्नेह होता , मोरोंपंतानी कोणतेही काव्य केलं कि महाराजांना दाखवत आणि मगचं प्रकाशित करत..
३६ वर्ष चातुरमास सेवा झाल्यानंतर महाराजांनी श्रीक्षेत्र अनवा ता.भोकरदन ( आज हि तिथं समाधी आहे. ) येथे समाधी घेतली . महाराजांच्या बहिन जिजाईनां खूप दु:ख झाले .जिजाई म्हणताात. 'सगळं जगचं नश्वर आहे .त्याचा मला शोक नाही . माझा दादाही कधी ना कधी अंतरणार होताच पण त्याने पंढरीमध्ये देह ठेवला असता तर मला फार बरं वाटलं असतं. चित्तेची सर्व तयारी पूर्ण झाली . आता देह ठेवायचा, एवढ्यात महाराजच मंद हसत उठले आणि जिजाईनां जवळ बोलवलं अन् म्हणाले, ' तुला दु:खी करणं अशक्य आहे.तुझी इच्छा पूर्ण करु .....
पुढे चातुर्मासात महाराजांनी विचार करुन श्रावण वद्य त्रयोदशी हा दिवस निवडला ..
त्रयोदशी उजाडली. ..  महाराजांनी स्नानादि नित्य कर्म उरकून पांडूरंगाचं दर्शन घेतलं आणि सकाळीचं कीर्तन प्रारंभ केला ..सर्वाचा निरोप घेतला आणि आसनावर बसले , सगळे भक्त सभोवती होतेचं . बाबा पाध्ये ,आर्याकार मोरोंपंत , आहिल्याबाई होळकर..
श्रावण वद्य त्रयोदशी ,शनिवार पुष्प नक्षत्र अभिजित योग .. या दिवशी मध्यान्ह शिगेला आली .महाराजांनी शांतपणे हात जोडले 'श्रीविठ्ठल ' म्हणाले आणि शांत झाले....अंतयात्रा , नगर प्रदक्षिणा झाली ..चंद्रभागेवर आली .मलयागिरी चंदणाची चिता रचली ..श्रीविठ्ठल नामजप सुरु होताचं ...पुंडलिक वरदाच्या गर्जनेत महाराजांचे चिरंजीव पू. मैराळ महाराज यांनी अग्नी दिला....

     सुमारे  २७० वर्षांपासून  चातुर्मास कीर्तनसेवा अव्याहत पणे सुरु आहे.. सध्या गादीवर प.पू.श्रीगुरु ज्ञानेश्वर महाराज चातुर्मास्ये अनवेकर हे सद्गुरु विठोबा दादामहाराजांचे ११ वे वंशज आहेत....
पुण्यतिथि निमित्त पू. महाराजांच्या चरणी कोटी कोटी दंडवत. ....

-  श्रीगुरुसेवक
पुष्कराज उर्फ राज तुकाराम महाराज चातुर्मास्ये

मंगळवार, २३ ऑगस्ट, २०१६

संतश्रेष्ठ सद्गुरु विठोबा दादामहाराज चातुर्मास्ये पुण्यतिथी सोहळा २०१६

संतश्रेष्ठ_सद्गुरु_विठोबा_दादामहाराज_चातुर्मास्ये _२२५_वा_पुण्यतिथी_सोहळा_श्रीक्षेत्र पंढरपूर*

प्रारंभ - २४ ऑगस्ट २०१६ बुधवार

सांगता - ३० ऑगस्ट २०१६ मंगळवार

>> श्रावण वद्य त्रयोदशी दि.३० ऑगस्ट २०१६ मुख्य दिवस <<

-- कार्यक्रमाची रुपरेषा --

पहाटे - ५ ते ६ काकडा भजन
सकाळी - ६ ते ७.३० सद्गुरुंच्या समाधीस पवमान अभिषेक , आरती
सकाळी - ८ ते ९ श्रीमद् भागवत कथा
सकाळी - १० ते ११ श्रीविठ्ठल नामजप
सकाळी - ११ ते १२ श्रीगाथा भजन
दुपारी - १२ ते ३ महाप्रसाद ,विश्रांती
दुपारी - ४ ते ५ हरीपाठ
सायं. - ५.३० नियमाचे चातुर्मास कीर्तन

स्थळ - श्री चातुर्मास्ये महाराज मठ , दत्त घाट श्रीक्षेत्र पंढरपुर

सोहळ्याचे फोटोस् बघण्यासाठी http://m.facebook.com/shrivitthal.templeanwa लाईक करा.

शुक्रवार, १५ जुलै, २०१६

आषाढी एकादशी रथोत्सव आणि चातुर्मास्ये महाराज परंपरा*"

*"आषाढी एकादशी रथोत्सव आणि चातुर्मास्ये महाराज परंपरा*"

निज जना अमृतें बहु तर्पिती स्व अनवे अनवे कर अर्पिती ||
सतत पुर्ण मुकुंद यशोंरसें न वदना वदना म्हणती असे||१||

(आर्याकार कवीवर्य मोरोपंत)

    कवीवर्य मोरोपंत आर्याकार यांच्या या वरील आर्येतुन दादा महाराज 'अन्वेकर' उपनांवाने "अनवे" नगरीत प्रगटले आहेत. अशा प्रकारचा आशय लक्षात येतो.
सतराव्या शतकातील पुर्वार्धाच्या शेवटी च्या काळात दादा महाराजांचा जन्म अनवे नगरीत "गोपिनाथ पंडीत गोसावी" यांच्या आचारसंपन्न कुळात झाला.
"त्या अनव्या
माझारी |
भरद्वाज गोत्राभीतरी |
गोपजींच्या वंशांतरी |
जन्मले दादामहाराज ||"
(दासगणू महाराज विरचित दादा म.च.अ.१ ओवी२०)

सदगुरु दादा महाराजांचा जन्म  भगवंताची उपासना  ज्या घरात अविरत आहे.त्या घरात झाला होता. त्यामुळे महाराज पारमार्थिक कार्यापासुन कसे दुर राहतील?
याचीच प्रचिती महाराजांच्या बाबतीत ही आली.प्राथमिक अध्ययन झाल्यावर सदगुरु दादा महाराजांनी पंढरीची वारी सुरु केली. एकुण १२ वर्षे पंढरीची आनवा-पंढरपूर वारी झाल्यावर एका वारीला पंढरीत महाराज असतांना साक्षात विटेवरच्या भगवंतानेच महाराजांना दृष्टांत दिला आणि आज्ञा दिली की,"संतश्रेष्ठ भानुदास महाराजांचे अवतार कार्य तुम्हाला पुर्ण करायचंय."आता वारी एकच करायची..."आषाढी ते कार्तिकी पंढरीत राहायचं आणि कीर्तनसेवा करायची."!!
यांच वर्णन दासगणु महाराज करतात-
"तु सांप्रत या भूवरी | तू पुर्वजन्म माझारी भानूदास होतास ||
आता हीच विनंती | आहे बापा तुजप्रती | चातुर्मास पंढरीप्रती | राहून कीर्तन करावे ||"
त्याचबरोबर सदगुरु दादा महाराज त्यांच्या स्वकृत अभंगात म्हणतात-
"जन्मभूमीस्थाना आज्ञा दिली हरी |
चातुर्मास वारी निरोपिली ||
कवीवर्य मोरोपंत आर्याकार म्हणतात-
"श्रीविठ्ठल निज जन सद्गुण कीर्तन सुखार्थ अवतरला |||

अशाप्रकारे चातुर्मासाची कीर्तनसेवा सुरु झाली.सर्वप्रथम ही सेवा काही वर्षे भगवंताच्या राउळात चालली.पण नंतर काही लोकांनी महाराजांना उपद्रव करण्यास सुरुवात केली.तेव्हापासुन चातुर्मासाची कीर्तनसेवा पंढरीच्या वाळवंटात पुंडलिकाच्या जवळ चालु झाली.पण वाळवंटात ऊन,वारा,पाऊस यांसारख्या नैसर्गीक आपत्तींमुळे वारकरी मंडळींना त्रास होत.तरीही कीर्तनसेवा मात्र अविरत चालु होती.
एकेदिवशी अचानकच पंढरीतील पेशव्यांचे सावकार" शिवरामपंत खाजगीवाले" यांच्या स्वप्नात भगवान पांडुरंगाने त्यांना आज्ञा दिली की "दादा महाराज अनवेकर यांच्याकडे जा आणि त्यांचा अनुग्रह घ्या,व त्यांना कीर्तनासाठी जागा उपलब्ध करुन दया"
शिवरामपंताना त्यावेळी महाराजांचा अनुग्रह मिळाला.पंतांनी त्या दिवशीची वास्तु बांधण्यासाठी सुरुवात केली.ही वास्तु पुर्ण झाल्यावर तिथे "विठ्ठल रुख्मणीच्या" मुर्तीची स्थापना केली.त्यावेळी श्री खाजगीवाले व दादा महाराजांच्या लक्षात आले की गर्दी मुळे बहुतांश वारकऱ्यांचे पांडुरंगाचे दर्शन होत नाही. म्हणुन त्यावर्षी पासुनच *सदगुरु दादा महाराज चातुर्मास्ये व शिवरामपंत खाजगीवाले याच्या पुढाकारातुन आषाढीचा रथोत्सव चालु करण्यात आला*.रथासोबत त्याकाळी सदगुरु दादा महाराजांची दिंडी असायची.हा सोहळा नयनरम्य व्हायचा.
याचे वर्णन चरित्रकार श्री विष्णुपंत तोंडापुरकर करतात-
*"मंडप उभावोनी अति त्वरे | विनवोनी भक्ता सुविचारे | स्थापुनी मूर्ती अति सुंदरे | सन्मुख सादर कीर्तनारंभ*
||(सदगुरु दादा म.ओवीबध्द चरित्र.अ.७,ओवी१०६)

*रथ करोनी निर्माण | संतसभे भक्तजन | आनंदे कथा कीर्तन |मुर्ती स्थापन रथामाजी ||*
(सदगुरु दादा म.ओवीबध्द चरित्र अ.७ओवी १०७)
अशा प्रकारे इथुन पुढील चातुर्मासाची कीर्तन सेवा "खाजगीवाल्यांनी बांधलेल्या वाड्यात(म्हणजे सध्या माहेश्वरी धर्मशाळा जिथे अस्तित्वात आहे त्याठिकाणी!) होण्यास सुरुवात झाली.
ही रथाच्या दिंडीची परंपरा चातुर्मास्ये परंपरेतील ८ वे सत्पुरुष ह.भ.प.वै.सदगुरू बाळकृष्ण महाराज चातुर्मास्ये यांच्यापर्यंत चालु होती.पण काही वादामुळे ती बंद पडली.
पण तरीही आजच्या काळातसुद्धा *आषाढी एकादशी ला म्हणजे आजच्या दिवशी "चातुर्मास्ये महाराजांची दिंडी" पुर्वी रथ ज्या वेळेला निघायचा त्या वेळेवरच म्हणजे दुपारी १२ वाजताच मठातुन निघते*बाकी नियमाच्या दिंड्या सकाळीच निघतात.आणि दुपारी १२ वाजेपर्यंत जागेवर पोहचतात.
दिंडी प्रदक्षिणेहून मठात आल्यावर ,संध्याकाळी नियमाप्रमाणे आजच्या दिवशी गादीवरील सदगुरु दादा महाराज चातुर्मास्ये यांचे *विद्यमान वंशज ह.भ.प गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली महाराज चातुर्मास्ये यांची कीर्तनाची सेवा होते.*
तर आषाढ वद्य पंचमी पासुन चातुर्मासाच्या कीर्तनसेवेला सुरुवात होते.

*पुज्य दादा महाराजांनी सुरु केलेल्या चातुर्मासाच्या कीर्तन सेवेच यंदाच २६१ वर्ष आहे.*!!

संदर्भ ग्रंथ-
१)संतकवी
दासगणू महाराज लिखीत सदगुरु दादा महाराजांचे चरित्र.
२)कवीवर्य मोरोपंत आर्याकार विरचित सदगुरु दादा महाराज यांचे स्तुती काव्य.
३) साम्प्रदाय दर्शन
लेखक- मिलींद दंडवते,आळंदी.
४)श्री विष्णूपंत तोंडापूरकर लिखीत,सदगुरु दादा महाराजांचे ओवीबध्द चरित्र
५)गुरुलिलामृत.
लेखक- विष्णूपंत तोंडापूरकर
६) मोरोपंतांचे मित्रमंडळ...

अशा प्रकारेच "संत साहित्य अभ्यास मंडळाच्या" सदस्यांचे सर्व लेखन नेहमी वाचण्यासाठी आता खालील Link ला भेट द्या-

abhyasmandal.blogspot.com

© श्रीगुरुदास
पराग तुकाराम महाराज चातुर्मास्ये.