*वारकरी संतांच्या पालखी सोहळ्याचा इतिहास*
भाग ५ - 'आदिशक्ती मुक्ताबाईंचा' पालखी सोहळा:-
आदिशक्ती मुक्ताबाई म्हणजे सतं ज्ञानोबाराय,निवृत्तीनाथ महाराज,संत सोपान काका महाराज यांच्या लहान भगिनी.पण आईसाहेब मुक्ताईंचा आधिकारही खुप श्रेष्ठ होता.
आमच्या खान्देश आणि मराठवाडा भागातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान म्हणजे मुक्ताईनगर आणि आदिशक्ती मुक्ताबाई...आजपर्यंतचा आदिशक्ती मुक्ताबाई संस्थान चा इतिहास मी अभ्यासला असता मला अस प्रकर्षाने दिसलं की, पंढरीच्या वारीवर प्रंचड निष्ठा,श्रध्दा असणाऱ्या वारकऱ्यांनीच आईंसाहेब मुक्ताबाईंच संस्थान आणि संस्थानचे कार्यक्रम संभाळले. त्या वारकरी मंडळीमध्ये ह.भ.प वै सखाराम महाराज ऐलोरेकर,ह.भ.प वै नामदेव महाराज चापोरेकर, चातुर्मास्ये महाराज फड परंपरेचे शिष्य ह.भ.प वै विठ्ठबुआ नाचणखेडेकर, ह.भ.प धर्माचार्य आदरणीय निवृत्ती बाबा वक्ते यांची नावे सर्वांत आधी येतात. अश्याच पंढरीची वारी करणाऱ्या दोन महात्म्यांनी आईसाहेब मुक्ताबाईंचा पालखी सोहळा सुरु केला.ते दोन महात्मे म्हणजे पंढरीचे निष्ठांवत वारकरी असणारे *ह.भ.प वै रामबुआ दुधलगांवकर आणि शाम बुआ दुधलगांवकर*!
या दोघा सख्या भावांनी इ.स १७०६ साली आदिशक्ती मुक्ताईंच्या पादुका छातीला बांधून काही वारकऱ्यांसमवेत पंढरीला जाण्यास सुरुवात केली.ज्या काळात ही वारी सुरु झाली तेव्हा ह.भ.प वै शामबुआ व वै.ह.भ.प रामबुआ यांच्या सोबत अतिशय थोडे वारकरी असत.जिथे जागा मिळेल तिथे ही दिंडी थांबायची.सुरुवातीला या दिंडीस 'मुक्ताईनगर- पंढरपूर' या प्रवासास येता-जाता ९० दिवस लागायचे.
या बन्धूद्वयांनी सुरु केलेला ह्या वारीसाठी कालांतराने पालखी करण्यात आली.काही दिंड्या सोहळ्यास जोडल्या गेल्या.
ह.भ.प वै रामबुआ आणि ह.भ.प वै शामबुआ गेल्यानंतर हा पालखी सोहळा महान भगवद् भक्त ह.भ.प सखाराम महाराज ऐलोरेकर यांच्या नेतृत्वात शिस्तीत चालला.ह.भ.प वै सखाराम महाराजानंतर काहीकाळ हा सोहळा ह.भ.प दत्तु महाराज बरसगांवकर,विवरेकर पाटील व नंतर ह.भ.प नामदेव महाराज चापोरेकर यांनी "ठेका" पध्दतीने हा पालखी सोहळा मोठ्या दिमाखात चालवला.या सर्व महात्म्यांच्या काळातच आदिशक्ती मुक्ताबाईंचा पालखी सोहळा विशाल झाला.
यांच्यानंतर चातुर्मास्ये महाराज प्रासादिक फडकरी परंपरेचे पट्टशिष्य, त्या काळाचे आदिशक्ती मुक्ताबाई संस्थानचे संस्थानाधिपती
"ह.भ.प वै विठ्ठलबुआ नाचणखेडेकर" यांनी त्यांच्या नेतृत्वात हा आईसाहेबांचा पालखी सोहळा मोठ्या भक्तिभावाने व निष्ठेने चालविला.
मला सुदैवाने आमच्या फडावरील आदिशक्ती मुक्ताईंच्या सोहळ्यातील एका निष्ठावंत वारकऱ्याची संगत लाभली.ते वारकरी म्हणजे महान भगवद् भक्त वै.ह.भ.प हरीभाऊ महाराज लढे.!आज हरीभाऊ या जगात नाहीत.पण वाचकांनो मला इथे सांगायला अभिमान वाटतोय की, ह.भ.प वै हरिभाऊंनी ५५ वेळा मुक्ताईनगर- पंढरपुर वारी केली होती. ज्या वर्षी ह.भ.प हरीभाऊ गेले त्याच्या एक वर्ष आधिही त्यांची वारी अविरत चालु होती.
मला आईसाहेबांचा सोहळा जरी अनुभता आला नसला,तरी ह.भ.प वै. हरिभाऊंच्या रुपाने ज्यांनी आईसाहेबांचा पालखी सोहळा चालवला,वाढवला त्यांचे दर्शन मात्र झाले होते.खरचं या वारकऱ्यांच्या सेवा धन्य धन्य आहेत. आदिशक्ती मुक्ताबाईंची ५५ वर्षे वारी करणाऱ्या ह.भ.प हरीभाऊंसाठी तुकोबारायांच एक प्रमाण शत प्रतिशत लागु पडत-
पंढरीचा वारकरी |
वारी चुको नेदी हरी ||
©श्रीगुरुदास
पराग तुकाराम महाराज चातुर्मास्ये.
आदरणीय तमाम वाचक मंडळी,
आज आपल्या लेखमालेचा शेवटचा दिवस...
त्यानिमीत्ताने थोडस....
लक्षातच नाही आलं न कधी लेखमाला संपली? ?सर्व संतांच्या निस्सीम कृपने आणि आमच्या परंपरेला असणाऱ्या पंढरीशाच्या आशिर्वादानेच हे साध्य झालेय..
माऊलींनीच सामर्थ्य देऊन हे कार्य पुर्ण करुन घेतले.
या कार्याला ह.भ.प गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली महाराज चातुर्मास्ये (दादा)ह.भ.प तुकाराम महाराज चातुर्मास्ये,माझे बन्धू ह.भ.प भानुदास महाराज चातुर्मास्ये,ह.भ.प नाथवंशज योगीराज महाराज गोसावी,ह.भ.प रावसाहेब महाराज गोसावी, ह.भ.प माझे परममित्र योगेश महाराज गोसावी(पालखीवाले),ह.भ.प मोहन महाराज बेलापुरकर,ह.भ.प सागर महाराज बेलापुरकर,ह.भ.प राम महाराज कदम, संत सोपानकाकांचे पुजाधिकारी ह.भ.प गोपाळ महाराज गोसावी,ह.भ.प केशव महाराज नामदास( संत नामदेव महाराजांचे यांचे वंशज),ह.भ.प धर्माचार्य निवृत्ती बाबा वक्ते,मुक्ताई संस्थानचे ह.भ.प उद्धव महाराज जुनारे आदी मान्यवर मंडळींचे खुप मार्गदर्शन लाभले.
लवकरच पुढची लेखमाला आपल्यासमोर सर्व संतांच्या कृपेने घेऊन येणार आहे...त्यालाही वाचकांचा प्रचंड प्रतिसाद लाभेल ही आशा आहे.
जय हरी...
चला तर मग लागुयात आता वारीच्या तयारीला.......!