*"आषाढी एकादशी रथोत्सव आणि चातुर्मास्ये महाराज परंपरा*"
निज जना अमृतें बहु तर्पिती स्व अनवे अनवे कर अर्पिती ||
सतत पुर्ण मुकुंद यशोंरसें न वदना वदना म्हणती असे||१||
(आर्याकार कवीवर्य मोरोपंत)
कवीवर्य मोरोपंत आर्याकार यांच्या या वरील आर्येतुन दादा महाराज 'अन्वेकर' उपनांवाने "अनवे" नगरीत प्रगटले आहेत. अशा प्रकारचा आशय लक्षात येतो.
सतराव्या शतकातील पुर्वार्धाच्या शेवटी च्या काळात दादा महाराजांचा जन्म अनवे नगरीत "गोपिनाथ पंडीत गोसावी" यांच्या आचारसंपन्न कुळात झाला.
"त्या अनव्या
माझारी |
भरद्वाज गोत्राभीतरी |
गोपजींच्या वंशांतरी |
जन्मले दादामहाराज ||"
(दासगणू महाराज विरचित दादा म.च.अ.१ ओवी२०)
सदगुरु दादा महाराजांचा जन्म भगवंताची उपासना ज्या घरात अविरत आहे.त्या घरात झाला होता. त्यामुळे महाराज पारमार्थिक कार्यापासुन कसे दुर राहतील?
याचीच प्रचिती महाराजांच्या बाबतीत ही आली.प्राथमिक अध्ययन झाल्यावर सदगुरु दादा महाराजांनी पंढरीची वारी सुरु केली. एकुण १२ वर्षे पंढरीची आनवा-पंढरपूर वारी झाल्यावर एका वारीला पंढरीत महाराज असतांना साक्षात विटेवरच्या भगवंतानेच महाराजांना दृष्टांत दिला आणि आज्ञा दिली की,"संतश्रेष्ठ भानुदास महाराजांचे अवतार कार्य तुम्हाला पुर्ण करायचंय."आता वारी एकच करायची..."आषाढी ते कार्तिकी पंढरीत राहायचं आणि कीर्तनसेवा करायची."!!
यांच वर्णन दासगणु महाराज करतात-
"तु सांप्रत या भूवरी | तू पुर्वजन्म माझारी भानूदास होतास ||
आता हीच विनंती | आहे बापा तुजप्रती | चातुर्मास पंढरीप्रती | राहून कीर्तन करावे ||"
त्याचबरोबर सदगुरु दादा महाराज त्यांच्या स्वकृत अभंगात म्हणतात-
"जन्मभूमीस्थाना आज्ञा दिली हरी |
चातुर्मास वारी निरोपिली ||
कवीवर्य मोरोपंत आर्याकार म्हणतात-
"श्रीविठ्ठल निज जन सद्गुण कीर्तन सुखार्थ अवतरला |||
अशाप्रकारे चातुर्मासाची कीर्तनसेवा सुरु झाली.सर्वप्रथम ही सेवा काही वर्षे भगवंताच्या राउळात चालली.पण नंतर काही लोकांनी महाराजांना उपद्रव करण्यास सुरुवात केली.तेव्हापासुन चातुर्मासाची कीर्तनसेवा पंढरीच्या वाळवंटात पुंडलिकाच्या जवळ चालु झाली.पण वाळवंटात ऊन,वारा,पाऊस यांसारख्या नैसर्गीक आपत्तींमुळे वारकरी मंडळींना त्रास होत.तरीही कीर्तनसेवा मात्र अविरत चालु होती.
एकेदिवशी अचानकच पंढरीतील पेशव्यांचे सावकार" शिवरामपंत खाजगीवाले" यांच्या स्वप्नात भगवान पांडुरंगाने त्यांना आज्ञा दिली की "दादा महाराज अनवेकर यांच्याकडे जा आणि त्यांचा अनुग्रह घ्या,व त्यांना कीर्तनासाठी जागा उपलब्ध करुन दया"
शिवरामपंताना त्यावेळी महाराजांचा अनुग्रह मिळाला.पंतांनी त्या दिवशीची वास्तु बांधण्यासाठी सुरुवात केली.ही वास्तु पुर्ण झाल्यावर तिथे "विठ्ठल रुख्मणीच्या" मुर्तीची स्थापना केली.त्यावेळी श्री खाजगीवाले व दादा महाराजांच्या लक्षात आले की गर्दी मुळे बहुतांश वारकऱ्यांचे पांडुरंगाचे दर्शन होत नाही. म्हणुन त्यावर्षी पासुनच *सदगुरु दादा महाराज चातुर्मास्ये व शिवरामपंत खाजगीवाले याच्या पुढाकारातुन आषाढीचा रथोत्सव चालु करण्यात आला*.रथासोबत त्याकाळी सदगुरु दादा महाराजांची दिंडी असायची.हा सोहळा नयनरम्य व्हायचा.
याचे वर्णन चरित्रकार श्री विष्णुपंत तोंडापुरकर करतात-
*"मंडप उभावोनी अति त्वरे | विनवोनी भक्ता सुविचारे | स्थापुनी मूर्ती अति सुंदरे | सन्मुख सादर कीर्तनारंभ*
||(सदगुरु दादा म.ओवीबध्द चरित्र.अ.७,ओवी१०६)
*रथ करोनी निर्माण | संतसभे भक्तजन | आनंदे कथा कीर्तन |मुर्ती स्थापन रथामाजी ||*
(सदगुरु दादा म.ओवीबध्द चरित्र अ.७ओवी १०७)
अशा प्रकारे इथुन पुढील चातुर्मासाची कीर्तन सेवा "खाजगीवाल्यांनी बांधलेल्या वाड्यात(म्हणजे सध्या माहेश्वरी धर्मशाळा जिथे अस्तित्वात आहे त्याठिकाणी!) होण्यास सुरुवात झाली.
ही रथाच्या दिंडीची परंपरा चातुर्मास्ये परंपरेतील ८ वे सत्पुरुष ह.भ.प.वै.सदगुरू बाळकृष्ण महाराज चातुर्मास्ये यांच्यापर्यंत चालु होती.पण काही वादामुळे ती बंद पडली.
पण तरीही आजच्या काळातसुद्धा *आषाढी एकादशी ला म्हणजे आजच्या दिवशी "चातुर्मास्ये महाराजांची दिंडी" पुर्वी रथ ज्या वेळेला निघायचा त्या वेळेवरच म्हणजे दुपारी १२ वाजताच मठातुन निघते*बाकी नियमाच्या दिंड्या सकाळीच निघतात.आणि दुपारी १२ वाजेपर्यंत जागेवर पोहचतात.
दिंडी प्रदक्षिणेहून मठात आल्यावर ,संध्याकाळी नियमाप्रमाणे आजच्या दिवशी गादीवरील सदगुरु दादा महाराज चातुर्मास्ये यांचे *विद्यमान वंशज ह.भ.प गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली महाराज चातुर्मास्ये यांची कीर्तनाची सेवा होते.*
तर आषाढ वद्य पंचमी पासुन चातुर्मासाच्या कीर्तनसेवेला सुरुवात होते.
*पुज्य दादा महाराजांनी सुरु केलेल्या चातुर्मासाच्या कीर्तन सेवेच यंदाच २६१ वर्ष आहे.*!!
संदर्भ ग्रंथ-
१)संतकवी
दासगणू महाराज लिखीत सदगुरु दादा महाराजांचे चरित्र.
२)कवीवर्य मोरोपंत आर्याकार विरचित सदगुरु दादा महाराज यांचे स्तुती काव्य.
३) साम्प्रदाय दर्शन
लेखक- मिलींद दंडवते,आळंदी.
४)श्री विष्णूपंत तोंडापूरकर लिखीत,सदगुरु दादा महाराजांचे ओवीबध्द चरित्र
५)गुरुलिलामृत.
लेखक- विष्णूपंत तोंडापूरकर
६) मोरोपंतांचे मित्रमंडळ...
अशा प्रकारेच "संत साहित्य अभ्यास मंडळाच्या" सदस्यांचे सर्व लेखन नेहमी वाचण्यासाठी आता खालील Link ला भेट द्या-
abhyasmandal.blogspot.com
© श्रीगुरुदास
पराग तुकाराम महाराज चातुर्मास्ये.