हे संतजीवन एकदा नक्की वाचा....
ज्ञानमहर्षीचा वैकुंठगमनसोहळा - आषाढी दशमी २०१६ श्रीक्षेत्र पंढरपूर….
तुम्ही संत मायबाप कृपावंत | काय मी पतित कीर्ती वाणू ||
अवतार तुम्हा धराया कारण | उद्धराया जन जड जीव ||
वाढावया सुख भक्ती भाव धर्म | कुळाचार नाम विठोबाचे ||
तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी | तैसे तुम्ही जगी संतजन ||
महाराष्ट्र या परम पावन भूमीत वारकरी सांप्रदायात अनेक थोर संत विभूती अवताराला आलेत आणि जड जीवाचा उद्धार करून आत्मोन्नतीचा मार्ग दाखवला.अश्याच या विदर्भाच्या पवित्र कुशीत फाल्गुन शुद्ध तृतीया शके १८३९ शनिवार दिनांक २४ फेब्रुवारी १९१७ ला सकाळी सात वाजता श्रीक्षेत्र अकोली जहागीर ता.अकोट.जिल्हा अकोला येथे एक तेजपुंज महान ज्ञानयोगी अवताराला आलेत ते म्हणजे गुरुवर्य श्री संत वासुदेव महाराज.गुरुवर्य महाराजांनी वयाच्या पाचव्या वर्षी काळगव्हाण येथे रामनवमीच रामजन्माच कीर्तन "संतचरणरज लागता सहज | वासनेचे बीज जळोनी जाय ||"या अभंगावर केल आणि ब्रम्ह्स्वरुपाच दर्शन सर्वांच्या हृदयात झाल.बाविसाव्या वर्षी ईश्वरप्राप्तीसाठी सातपुड्यात गेले.गजानन महाराजांनी त्यांना साक्षात्कार देवून सांगितले कि पंढरपूरला जा तेव्हा महाराज विठ्ठला जवळ आले.आशीर्वाद घेतला आणि पंढरपुरात विचारणा केली कि मला योग्य मार्ग कोण दाखवेल ? तेव्हा त्यांना गुरुवर्य बंकटस्वामी महाराजांचं नाव सांगण्यात आल.बंकटस्वामी महाराजांनी त्यांना सांगितल कि आळंदीत जोग महाराज संस्थेत जा.तिथून महाराज आळंदीत आले ते वर्ष होते १९३९ आणि संस्थेच्या नियमाप्रमाणे १०८ ज्ञानेश्वरीचे पारायण केलेत आणि संस्थेत बसले.४ वर्षाचा अभ्यासक्रम एकाच वर्षात पूर्ण करून संपूर्ण गुरुजनांच्या हृदयात प्रेमाच स्थान मिळवलं.पुढे पुन्हा पंढरपूरला गेलेत आणि भगवान शास्त्री धारूरकर यांच्याकडे ब्रम्ह्सुत्र आणि गीताभाष्य ऐकले.तेव्हा त्यांच्याबरोबर गुरुवर्य धुंडा महाराज देगलूरकर आणि गुरुवर्य मामासाहेब सोबत होते.पुढे बनारसला वेद आणि उपनिषद यांचा अभ्यास केला.कीर्तन प्रवचनाला सुरुवात झाली.सद्गुरु जोग महाराजांची परंपरा अंगात पूर्णपणे मुरल्यामुळे"जेथे कीर्तन करावे | तेथे अन्न न सेवावे ||"या अभंगाला अनुसरून एक पै न घेता धर्मजागृती केली.पुढे नागझरी येथे वारकरी शिक्षण संस्थेच प्राचार्य पद स्वीकारलं.गौरीशंकर महाराज यांची शेगावला भेट झाली आणि त्यांनी सद्गुरु गजानन महाराजांचे अंतरंग प्राणप्रिय पट्टशिष्य आणि वासुदेव महाराजांचे आजोबा श्रीसंत भास्कर महाराज यांच्या अडगाव येथील संजीवन समाधीचा जीर्णोद्धार करायची आज्ञा दिली.संपूर्ण आमजनतेच्या सहकार्यातून १९५५ साली ४०००० वारकरी आणि ११०० संतांच्या उपस्थित गुरुवर्य मामासाहेब दांडेकर यांच "हेचि दान दे गा देवा" या अभंगावर कीर्तन झाल आणि समाधीचा जीर्णोद्धार केला.त्या कार्यक्रमाला गौरीशंकर महाराज,बंकटस्वामी महाराजांचे पुतणे भीमसिंग महाराज राजपूत,आळंदीचे भाऊसाहेब वरोलिकर,गोपाळबुवा नागरगोजे,नाना महाराज कोठेकर,प्रल्हादबुवा इलोरेकर,पांडुरंगबुवा पाटकर हे संत उपस्थित होते.पुढे श्रीसंत गजानन महाराजांनी सजल केलेली अकोली जहागीर शेत सर्वे नंबर ५२ मधील विहीर हिचा जीर्णोद्धार २१/११/१९६३ ला केला.संतचरीत्राबाबत लोकांच्या असलेल्या गैरसमजुती दूर करण्यासाठी आणि वारकरी संत विचारांचं कार्य काय आहे यासाठी गुरुवर्य महाराजांनी ३७ ग्रथांच स्वज्ञानांतून लिखाण केल.त्या संत चरित्राची दखल परदेशात सुद्धा घेतल्या गेली आणि तिथेही ते ग्रंथ प्रकाशित झाले.पुढे ८/७/१९९८ ला आळंदी येथील सिद्धबेटातील मंदिरे काही समाज कंटकांनी जमीनदोस्त केली.त्यासाठी सरकार कडे पाठपुरावा करून सुप्रीम कोर्टात लढा कायद्याच्या चौकटीतून दिला आणि सिद्धबेट मुक्त करून दिल.गुरुवर्यांनी कुठलीच अपेक्षा न ठेवता सन २००२ मध्ये आपली संपूर्ण मालकी हक्काची जागा,जमीन,द्रव्य हे श्रीसंत गजानन महाराज संस्थान शेगाव यांना दान दिले.संपूर्ण महाराजांच्या इच्छेप्रमाणे कार्य झाल आणि आता वेध लागले होते ते वैकुंठाला जाण्याचे.सन २००९ मध्ये गुरुवर्य महाराज खूप आजारी पडले.सर्वांच्या लक्षात येऊ लागल कि गुरुवर्य आपल्या दृष्टीआड होणार.महाराजांनी आवराआवर सुरु केली.आपल्या जवळच्या मंडळींना बोलावून घेतले.श्री माधवराव मोहोकार,सौ.गीताआक्का,ची.पुरुषोत्तम,ची.उमेश आणि अकोल्याचे गुरुवर्यांचे परमभक्त श्री वासुदेवराव महल्ले साहेब आणि त्यांना सांगितले कि आता आम्हाला निरोप द्या.सर्वजण रडायला लागले.गीता आक्काने महाराजांचे नातू श्री ज्ञानेशप्रसाद पाटील यांना बोलावून घेतले आणि सांगितले कि आपला आधार निघून जातोय.तेव्हा महाराज सर्वांना म्हटले"मी तर चांगदेवासारखा १४०० वर्ष जगू शकतो परंतु ती काळाची विटंबना होईल.मी जरी शरीराने गेलो तरी आत्मरूपाने कायम इथेच आहे.तुम्ही मी सांगितलेला भक्तिमार्ग सोडू नका.देहू,आळंदी,पंढरपूर,हि वारी,गळ्यात पवित्र तुळशीची माळ,एकादशी व्रत व गाथा ज्ञानेश्वरीच वाचन कधी सोडू नका."आषाढ शुद्ध चतुर्थीला शुक्रवार दिनांक २६/६/२००९ ला नेहमीप्रमाणे गुरुवर्य महाराज शेगाव वरून पंढरपूर नेण्यासाठी आलेल्या गाडीत बसले.शनिवारी सकाळी २७/०६/२००९ ला पंढरपुरात पोहोचले.संस्थानच्या भक्त निवास मध्ये मुक्काम असे.सोमवारी सकाळी साधकांचे मायबाप सद्गुरु मारोती बाबा कुऱ्हेकर महाराजांना भेटायला आले.मारोती बाबांसोबत अध्यात्मविषयक चर्चा झाली.
मारोती बाबांना म्हटले"आता मला सुखाने जावेसे वाटते".
मारोती बाबा म्हटले "महाराज तुमचा आधार आम्हास हवा आहे."
महाराज मारोती बाबांना म्हटले "मला माउली कृपेने अजूनही आत्मज्ञान आहे" असे म्हणून परमोच्च ज्ञानाच्या दोन चार ओव्या सांगितल्या
"तरी आता देह असो अथवा जावो | आम्ही तो केवळ वस्तूची आहो | का जे दोरी सर्पत्व वावो | दोराचीकडूनि ||"
"मज तरंगपण असे कि नसे | हे उद्कांसी काही प्रतिभासे | ते भलतेव्हां जैसे तैसे | उदकची कि ||",
"तरंगाकारे न जन्मेचि | ना तरंगलोपे न निमेचि | तेवी देही जे देहेचि | वस्तू झाले ||",
"मग भलतेथ भलतेव्हां | देह्बंधू असो अथवा जावा | परी अबंधा नित्य ब्रम्ह्भावा | बिघाड नाही ||".
असे दिव्य आत्मज्ञान ऐकून मारोती बाबा उपस्थितांना म्हणाले
"ते ऋणवैपण देखोनि आंगी | आपुलियाचि उत्तीर्णत्वालागी | भक्ताचिया तनुत्यागी | परिचर्या करी ||",
"देह वैकल्याचा वारा | झणे लागेल या सुकुमारा | म्हणौनी आत्मबोधाचा पांजिरा | सुये तयाते ||"
अश्या ओव्या त्यांनी म्हटल्या.मारोती बाबांनी सांगितले कि "वासुदेव महाराजांचा सांभाळ प्रत्यक्ष माऊली करीत आहेत.अशा परमज्ञानी साक्षात ईश्वरच असलेल्या महाराजांची सेवा करणारे सर्व भक्त मंडळी धन्य धन्य आहेत.महाराज पूर्ण बोधावर असून सर्व काही महाराजांच्या इच्छेप्रमाणे सुरु आहे.महाराज विदेही अवस्थेत आहेत."मंगळवार दिनांक ३०/०६/२००९ ला संस्थानच्या पंढरपूर शाखेत महाराजांचे दुपारी चार वाजता प्रवचन झाले.त्याच रात्री "हीच व्हावी माझी आस | जन्मोजन्मी तुझा दास ||"या अभंगावर कीर्तन झाले.गुरुवार दिनांक २/७/२००९ ला माऊली पंढरपुरात येण्याची आर्त वाट पाहू लागले.माऊली पंढरपुरात आली आणि संस्थानमध्ये सुरु असलेला कीर्तनातील "ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम "हा गजर ऐकताच माऊली माऊली म्हणून रात्री ९.४५ वाजता गुरुवर्यांनी कायमचे डोळे मिटले.एक तेजस्वी,भक्तीचा,ज्ञानाचा दीप विझला.चालता बोलता चिंतामणी पंढरपूरच्या वाळवंटात हरवला.दिनांक ३/७/२००९ ला आषाढी एकादशीच्या दिवशी संस्थानच्या शिस्त बद्ध वाटचालीत भव्य दिव्य वैकुंठरथावर गुरुवर्य महाराज आरूढ होवून दिंड्या पताकांच्या भारात असंख्य भक्तांच्या शोकात अखंड चंद्रभागे मातेच्या वाळवंटात अग्निरुपात स्थिरावले.श्री सारंगधर महाराज मेहूनकर,श्री बंडातात्या कराडकर, श्री तुकाराम महाराज सखारामपुरकर, श्री प्रकाश महाराज जवंजाळ, श्री नरहरी महाराज चौधरी, श्री भास्करगिरी महाराज देवगड, श्री संदीपन महाराज हसेगावकर, श्री रामेश्वर महाराज तिजारे, श्री रंगराव महाराज टापरे, श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ, श्री रामेश्वर महाराज शास्त्री इत्यादींची श्रद्धांजलीपर भाषणे होवून सगळ्यांनी महाराजांना अखेरचा निरोप दिला. गुरुवर्य महाराजांवर ज्यांच नितांत प्रेम आणि श्रद्धा होती अशे धुळे जिल्ह्यातील महान संत गुरुवर्य तुळशीराम बाबा होळकर त्यांच्या अहिराणी भाषेत म्हटले."माझा वासुदेव बाबा अजून गेला नाही,त्याने कपडा टाकला,तो गंज(पुन्हा पुन्हा) भेट देईल."
वासुदेव माउली लीन झाली कैसी | अखंड विसावली चंद्र्भागेसी ||
वासुदेवा चित्त तुझे चरणासी | नाठवे मानसी दुजे काही ||
पालखीत देह दिसे दिव्य तेज | कारे मायबापा झालासी तू शांत ||
तुझी वाट किती पाहू रे मी आता | एकवेळ भेटी अनाथांच्या नाथा ||
देवादिक ही झाले निशब्द आता | ओवाळोनी सांडेन जीव हा माझा ||
अश्या या महान संतांच्या चरणी साष्टांग दंडवत.
यंदाचा पुण्योत्सव हा दिनांक 14 जुलै रोजी श्रीसंत वासुदेव महाराज धर्मशाळा,म्हसोबा मंदिरजवळ श्रीक्षेत्र पंढरपूर येथे रात्री 9.45 वाजता महाआरतीने संपन्न होणार आहे...
(वरील सर्व माहिती हि गुरुवर्य महाराजांचे नातू श्री ज्ञानेशप्रसाद पाटील सावरकर,अकोट यांच्या पत्नी सौ इंद्रायणी पाटील सावरकर यांनी लिहिलेल्या अप्रतिम अश्या श्रीसंत वासुदेव दर्शन या गुरुवर्य महाराजांच्या जीवनावरील ग्रंथातून दिलेली आहे.)
संकलक - श्रीकांत महाराज खवले
आजही वारकरी पंथात परमात्म्यला गिळून पचवणारी साधक मंडळी आहेत.अपण लिहित रहा.
उत्तर द्याहटवा