सोमवार, ४ जुलै, २०१६

साठवणीतील वारी. भाग- २

*** लागला टकळा पंढरीचा ***

#साठवणीतलीवारी-२

वारीच्या वाटेवरील गावात माझे बालपण गेले, हा माझ्यावरचा भगवान माउलींचा खूप मोठा उपकार आहे. कारण त्यामुळेच नकळत माउली व वारी जीवनात आले व पुढे कायमचेच अविभाज्य घटक होऊन राहिले. फलटण गावाच्या मध्यवर्ती भागात लक्ष्मीनगर आहे. त्यात आमचे घर आहे. घरासमोर भगवान श्रीमाउलींचे मंदिर आणि त्याला लागूनच प. पू. डॉ. गोविंदकाका उपळेकर महाराजांचे समाधिमंदिर आहे. माझे सगळे बालपण याच दोन्ही मंदिरात गेलेले आहे. इतके की मी सकाळी उठल्यावर माउलींच्याच मंदिरात माझा फुटबॉल घेऊन एकटाच खेळायला जात असे. दोन्हीकडून पळत पळत जाऊन आपणच बॉल मारायचा,असा खेळ चाले. माझा दिवसातला जास्तीतजास्त वेळ या दोन्ही मंदिरांमध्येच जात असे.
हे माउलींचे मंदिर प्रशस्त असून माउलींची मूर्ती खूप सुंदर आहे. अशी मूर्ती इतरत्र कुठेही नाही. फलटणच्या राणीसाहेब कै. श्रीमंत लक्ष्मीदेवी नाईक निंबाळकर यांनी हे मंदिर बांधले. त्याची हकिकतही मोठी गोड आहे.
राणीसाहेबांच्या पर्यंत जवळपास सात पिढ्या निंबाळकर घराण्यात औरसपुत्र कधी जगलाच नाही. सात आठ पिढ्या दत्तकपुत्रच राजगादीवर बसे. पुढे प. पू. श्री. काकांच्या प्रेरणेने कै. लक्ष्मीदेवी राणीसरकारांनी भगवान श्रीमाउलींची मनोभावे प्रार्थना करून उपासना केली. माउलींच्या कृपेने त्यांची संतती जगली. पण शाप शेवटी महात्म्याचाच होता, तो खोटा कसा ठरणार ? संतती जगली पण राज्य गेले, म्हणजे औरस पुत्र राजा झालाच नाही शेवटपर्यंत !  तसेच राणीसाहेब  एकदा विमान अपघातात मरता मरता आश्चर्यकारकरित्या बचावल्या, तेही प. पू. काकांच्या सूचनेमुळे आणि भगवान माउलींच्याच कृपेने. तेव्हापासून राणीसाहेबांनी मात्र मनापासून माउलींची सेवा आरंभिली. स्वहस्ते पूर्ण ज्ञानेश्वरी लिहून काढली. आळंदी देवस्थानला त्या काळात लक्षावधी रुपयांची मदत केली. लक्ष्मीनगर भागात माउलींचे सुंदर मंदिर बांधले व त्या मंदिरातच अवघ्या एका खोलीत राहून सेवा करू लागल्या. त्यांनी सर्व राजवैभवाचा त्याग केला.
या मंदिरात भगवान श्रीमाउलींची लाईफ साईझची संगमरवरी मूर्ती आहे. माउलींचे हे ध्यान खूप वेगळे आहे. त्यांच्या हातात ज्ञानेश्वरी असून ते ती सांगत आहेत. डोळे अगदी भावपूर्ण आहेत. मूर्तीसमोर माउलींच्या पादुका समाधीशिलेवर स्थापन केलेल्या आहेत.
या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळी पू. श्री. गोविंदकाका उपळेकर महाराज अचानक उठून तरातरा चालत पुणे रस्त्यावर पार गावाबाहेर पर्यंत गेले. तोंडाने ' गोळा आला गोळा आला ' असे पुटपुटत होते. कोणाला काहीच कळेना. थोड्या वेळाने अंगावरच्या उपरण्यात काहीतरी धरल्यासारखे ते घेऊन आले व माउलींच्या नुकत्याच प्रतिष्ठापना झालेल्या पादुकांवर ते उपरणे रिकामे केले. या सर्व प्रकाराबद्दल त्यांना विचारल्यावर पू. श्री. काका उत्तरले, " तुम्ही माउलींचे आवाहन केलेत पण त्यांच्या स्वागतासाठी कोणी गेलाच नाहीत, म्हणून मग मी जाऊन त्यांचे स्वागत केले व त्यांचे तेज सन्मानाने घेऊन आलो. " अशाप्रकारे फलटणच्या आमच्या  श्रीज्ञानेश्वर मंदिरात भगवान माउलींची प्रतिष्ठापना प्रत्यक्ष प. पू. श्री. उपळेकर महाराजांनी केलेली आहे.
माझे सगळे लहानपण या माउलींच्या आणि प.पू. काकांच्या मंदिरातच खेळण्यात गेलेले आहे. त्या काळात माझ्या बालमनावर माउलींच्या प्रेमाचे जे संस्कार झाले ते माझ्यासाठी फार मोलाचे ठरलेले आहेत.
माउलींच्या मंदिरात रोज आरतीनंतर पंचपदी होई व दर गुरुवारी आरतीपूर्वी पादुकांची प्रदक्षिणा होई. मी दररोजच्या संध्याकाळच्या आरतीला उपस्थित असायचोच. कधी कधी गुरुजी नसतील तर मलाच प्रदक्षिणेच्या वेळी माउलींच्या पादुका धरण्याचे भाग्य लाभत असे. त्यावेळी माझा मित्र कै. प्रसाद नेर्लेकर माउलींची पूजा करायचा. तो आणि मी एकत्रच रुद्र, पुरुषसूक्त इ. शिकलो होतो. माउलींच्या मंदिरात कै.सौ. भगीरथीबाई उडपीकर नावाच्या फार गोड आजी सेवेला होत्या. उडपीहून पंढरपूरला वारीसाठी आलेल्या असताना त्यांची व त्यांच्या नवऱ्याची चुकामूक झाली. बरोबर लहान मुलगी देखील होती. त्यावेळी राणीसरकार पंढरपुरातच होत्या. त्यांनी भगीरथीबाईंना आपल्या सोबत आणले व माउलींच्या मंदिरात सेवेला ठेवले. मुलीच्या शिक्षणाची सोयही करून दिली. ती. कै. भगीरथीबाईंसाठी माझ्या मनात अतीव प्रेमादराची भावना आहे. त्यांनीच अगदी सुरवातीला माउलींच्या प्रेमाचे संस्कार माझ्यावर केले. त्या फार देखणे  हार करीत. त्यांचे कानडीमिश्रित मराठी ऐकायला गोड वाटे. त्या मला ' रोहनबाबा ' म्हणत.
भगवान माउलींच्या मूर्तीला त्या रिठ्याने व गरम पाण्याने स्नान घालीत व लहान बाळाला अंघोळ झाल्यावर गच्च बांधून ठेवतात तसे डोक्यावरून अंगभर शाल घालत असत. मी विचारल्यावर त्या म्हणाल्या, " बाबा, माउलींना स्नान घातले ना आत्ता, मग थंडी भरेल ना उघडे ठेवले तर. लहान बाळाप्रमाणे नाजूक आहेत ते ! " माउलींची ही मूर्ती नसून प्रत्यक्ष सुकुमार कोमल माउलीच समोर आहेत, या थोर भक्तिभावनेने त्या सेवा करीत. त्यांच्या त्या प्रेमसेवेचा न पुसला जाणारा संस्कार माझ्या मनात खोलवर रुजलेला आहे.  भगवंतांची भक्ती कशी करावी, याचे ज्ञान लाभले म्हणून मी भगीरथीबाईंचा आजही ऋणी आहे.
एक गंमत म्हणजे मला लहानपणी नेहमीच दृष्ट लागायची. त्या न सांगता माझी दृष्ट काढत असत, ती देखील माउलींच्या निर्माल्यानेच. काही कार्यक्रम वगैरे असला की आमच्या घरी येताना त्या निर्माल्य सोबत घेऊनच येत. अशाप्रकारे माउलीच माझे संरक्षक कवचही झालेले होते व आजही आहेत. भगीरथीबाई अतिशय उत्तम आणि रुचकर स्वयंपाक करीत. त्यांचे ते उंचपुरे, काठापदराचे नऊवारी लुगडे नेसलेले, तोंडात एकही दात नसलेले सात्त्विक सोज्ज्वळ रूप आजही माझ्या हृदयाच्या कोपऱ्यात जसेच्या तसे जिवंत आहे. वारीचे, माउलीप्रेमाचे संस्कार त्यांच्यामुळेच माझ्या मनात खोलवर रुजले, यात शंका नाही.
भागीरथीबाईंना माउलींच्याच मंदिरात राहिल्याने अनेक संतांची दर्शने झाली व सेवाही करायला मिळाली. पू. श्री. गोविंदकाका, पू. श्री. गुळवणी महाराज, पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज, पू. धुंडा महाराज देगलूरकर, पू. मामासाहेब दांडेकर इत्यादी अनेक संतांच्या दर्शनाच्या हकीकती त्या सांगत असत. त्यांना मरणही खूप चांगले आले. जन्मभर माउलींची सेवा केलेली ही भागीरथी नावाची भक्तिगंगा आषाढी एकादशीच्या सकाळी माउलींची पूजा झाल्यावर हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने माउलीचरणीं कायमची विसावली. केवढे मोठे भाग्य म्हणायचे हे ! त्या रोज प. पू. काकांच्या समाधीलाही एक हार देत असत. अजून मंदिरात नेऊन द्यायचा राहिल्याने त्यादिवशी तो हार त्यांच्या खोलीत ठेवलेला होता टेबलावर. त्याच्या शेजारीच कसेतरी वाटत होते म्हणून त्या लवंडल्या व तेथेच त्यांचे देहावसान झाले. आश्चर्य म्हणजे, पू. काकांच्या समाधीसाठी ठेवलेला भरगच्च तुळशीचा हार नेमका त्या टेबलावरून कसा काय माहीत नाही, पण त्यांच्या निष्प्राण देहावर पडला. जन्मभर त्यांनी देवांना मनोभावे दररोज हार करून वाहिला, शेवटी स्वत: प. पू. काकांनीच त्या सेवेचा त्यांना प्रसाद दिला असे म्हणायला हरकत नाही. मी त्या वर्षी, १९९६ साली पहिल्यांदाच वारीला गेलो होतो, त्यामुळे मला त्यांचे अंत्यदर्शन होऊ शकले नाही.
माउलींनी ज्ञानेश्वरीत व समर्थांनी दासबोधात म्हटल्याप्रमाणे भागीरथीबाईंची सेवा होती. माउलींसाठी जे जे शक्य ते ते त्या अतीव प्रेमाने करत असत. त्यांना रोज भरपूर फुले लागत हार करायला. म्हणून त्यांनी स्वत: खपून छान बाग तयार केलेली होती मंदिराच्या आवारात. प्राजक्त, गुलाब, मोगरा, कुंद, शेवंती, गलांडा, झेंडू, बेल, तुळशी अशी अनेक फुलझाडे डौलाने वाढलेली होती. त्यांचे नजाकतीने हार करणे चालायचे रोज रात्री आरतीनंतर. मी आईने जोरात हाक मारून बोलवेपर्यंत त्यांच्या ओट्यावरच गप्पा मारत बसलेलो असायचो. आईची हाक ऐकली की त्या म्हणत, " रोहनबाबा, पळा लवकर, नाहीतर धम्मकलाडू मिळेल घरी गेल्यावर. " भागीरथीबाई गेल्यानंतर माउलींच्या मंदिरातले चैतन्य उणावले यात शंका नाही. बहुदा त्यांच्या निर्मळ सेवेचा विरह माउलींनाही जाणवला असावा. त्यांची बागही नंतर वाळून गेली. पण त्यांच्या बागेतली त्यांच्याच हाताने लावलेली मोग-याची काही झाडे मी उपटून आणून माझ्या बागेत लावली होती. त्यांना जाऊन आता वीस वर्षे झाली, तरी ते मोगरे आजही भरपूर फुलत आहेत; प्रेमळ भागीरथीबाईंची आठवण ताजी ठेवत आणि त्यांची सेवा अविरत चालवत !
श्रीमंत राणीसाहेब स्वतः जातीने माउलींच्या पालखी प्रस्थानाला जात. आजही नाईक निंबाळकरांचा प्रतिनिधी उपस्थित असतोच. अंकलीचे शितोळे, ग्वाल्हेरचे शिंदे आणि फलटणचे निंबाळकर या तीन राजघराण्यांचे प्रतिनिधी असतात. राणीसाहेब वारीलाही जात; पण गाडीने. चालत जाऊ शकत नव्हत्या त्या. फलटणच्या मुक्कामाच्या दुसऱ्या दिवशी पहाटपूजेनंतर माउलींच्या पादुकांवर लक्ष तुलसीअर्चनाचा त्यांचा नियम होता. तो आजही चालू आहे. वाखरी मुक्कामात निंबाळकरांना पूजेचा मान आहे. संपूर्ण सोहळ्यात फक्त एकाच ठिकाणी माउलींच्या पादुका पूजेसाठी मुक्कामाचा तळ सोडून बाहेर दिल्या जातात. माउलींची पालखी फलटणला मुक्कामाला असते त्या रात्री, पालखीसोबत दुसरा जो पूजेचा पादुकाजोड असतो तो आमच्या माउलींच्या मंदिरात आणून त्यांना पवमानाचा अभिषेक होत असतो. रात्रभर पादुका मंदिरातच असतात. या पूजेत मी लहानपणी प्रत्येकवर्षी सहभागी झालोय आणि स्वहस्ते माउलींची पूजा देखील केलेली आहे.
फलटणचा मुक्काम संपवून पंढरपूरला जाताना दुसऱ्या दिवशी माउलींची पालखी पू. काका व श्रीमाउलींच्या मंदिरासमोरूनच जाते. त्यावेळी  निंबाळकर संस्थानातर्फे माउलींची पूजा होते व प्रत्येक दिंडीला नारळ-साखर दिली जाते. तेव्हा होणारी पूजा मीच रथात चढून करीत असे. त्या गर्दीत झटकन रथात चढण्याचा माझा सराव चांगला असल्याने कायम माउलींची ही सेवा मलाच मिळाली हे माझे परमभाग्य. आश्चर्य म्हणजे मी फलटणला होतो तेवढी वर्षे माउलींच्याच कृपेने रथात मला एकट्यालाच चढायला मिळायचे, त्यामुळे आपोआपच ती पूजा मला करायला मिळत होती. पूजा झाल्यावर मनसोक्त पादुकांवर डोके टेकवून नमस्कार करण्याचे सुख काही औरच असते !
या आमच्या मंदिरात परतीच्या वारीला (म्हणजे पंढरपूर ते आळंदी प्रवासात) भगवान श्रीमाउलींची पालखी यायची. आरती होऊन शिरावाटप व्हायचे व मग पालखी नामदेव विठ्ठल मंदिरात मुक्कामाला जाई. ही प्रथा पुढे बंद झाली. पण लहानपणी काही वर्षे त्या आरतीला उपस्थित राहिल्याचे मला व्यवस्थित स्मरते आहे.
श्रीमंत राणीसाहेबांचे सर्वात धाकटे चिरंजीव कै. श्रीमंत विक्रमसिंह तथा बाळमहाराज हे माळकरी होते. त्यांनीच राणीसाहेबांचा माउलीसेवेचा वारसा पुढे चालवला. त्यांचा माझ्यावर खूप जीव होता. मी पहिल्यांदा त्यांच्याबरोबरच माउलींच्या प्रस्थानाला आळंदीला गेलो होतो. बहुदा १९९१-९२ साल असेल. त्याआधी माझी आजी कै. मालतीबाई उपळेकरांच्या कॅन्सर ट्रीटमेंटच्या वेळी १९८९ साली आयुष्यात पहिल्यांदा मी आळंदीला जाऊन माउलींचे दर्शन घेतले होते. कै. आजीबरोबर मी ज्ञानेश्वरी वाचायचाही त्यासुमारास एकदा प्रयत्न केला होता. पण फारतर पहिला अध्यायच वाचून झाला, मग ' ये अपने बस की बात नही ', हे पटल्याने पुढे बालसुलभ कंटाळ्याने ते राहून गेले.
अशाप्रकारे माउलींनी माझ्या जीवनात बालपणीच प्रवेश करून पुढे कायमचा निवास केला, ही त्यांचीच माझ्यावरची असीम दयाकृपा म्हणायला हवी. आज त्यांच्याशिवाय आपल्याला दुसरे काही विश्वच असू नये, या निर्णयावर सद्गुरुकृपेने माझे मत ठाम होऊ लागलेले आहे आणि हीच माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे ! ( क्रमश: )
- रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
http://rohanupalekar.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा