बुधवार, ३१ ऑगस्ट, २०१६

वै.सदगुरु दादा महाराज चातुर्मास्ये पुण्यस्मरण!

आज महान श्रीविठ्ठलभक्त सद्गुरु विठोबा दादामहाराज चातुर्मास्ये यांची २२५ वी पुण्यतिथी.....

निमित्त लेखप्रपंच
        इ.स.सतराशे मध्ये   पू.दादामहाराजांचा जन्म श्रीक्षेत्र अनवा ता.भोकरदन जि.जालना येथे झाला .. सद्गुरु दादामहाराज हे संत भानुदास महाराजांचे अवतार होते.

संतकवी दासगणू महाराज लिहतात .

" उपरिर्दिष्ठ संतापरी । तु सांप्रत या भूवरी । तु पूर्वजन्मामाझारी । भानुदास होतास ।। "

पू.महाराजांचे शिक्षण जवळच्या वढोद गावी श्री.मुरलीधर कुलकर्णी यांच्या कडे झाले..संस्कृत अध्ययन ,व्यवहारलेखन ,श्रीमद्भागवत ,श्रीगीता यांचेही अध्ययन झाले..

' पंढरीची वारी आहे माझे घरी । अणिक न करी तिर्थव्रत '

या उक्तिप्रमाणे पंढरीची वारीचा नेम सुरु केला . बारा वर्ष वारी नेम झाल्यावर श्रीपांडूरंगानीच त्यांना सहकुटूंब चातुर्मास्य वारी करण्यात सुचविलं आणि कीर्तनसेवाही करण्यास सांगितलं.श्रीक्षेत्र पंढरपूरला आल्यावर १३ दिवस अनुष्ठान केले..

' जन्मभूमिस्थाना आज्ञा दिली हरी । चातुर्मास्य वारी निरोपिली ।।'

माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव ! आपणचि देव होय गुरु !!

हि गुर्वाज्ञा मान्य करुन ते पुढे चातुर्मासाला येऊ लागले , पांडुरंगासमोर गरुडखांबाजवळ कीर्तनं करु लागले.कीर्तनास खूप गर्दी जमू लागली आणि काही लोक कीर्तनात विघ्नं आणू लागले. असं ही काही दिवस गेले ...शेवटी पू.महाराजांनी पांडुरंगाचा निरोप घेतला आणि वाळवंटात येऊन कीर्तन करु लागले .असेही काही दिवस गेले पण तिथे पावसाचा आणि नदीच्या पाण्याचा त्रास होऊ लागला. श्रोते भर पावसातसुध्दा कशाचीही पर्वा न करता निर्धाराने बसत असत. कीर्तनकार तर देहभान विसरले होतेच. पण भक्तसाह्य श्री पांडुरंगाला हे सहन होईना .. त्यांनी  शिवरामपंत खाजगीवाले ( पेशव्यांचे सावकार ) यांना स्वप्नात गाठलं अन् सांगितलं 'शिवरामपंत , पू.दादामहाराजांना कीर्तनास त्रास होतोय. त्यांच्या साठी एखाद स्थळ बघा आणि नियम चालवा.. शिवराम पंतांनी लगेच मोठा वाडा बांधला अन् कीर्तनसेवा सुरु झाली अन् सुरुय.....

'चातुर्मास्ये अभिधान प्राप्ती'

       कीर्तनाची कीर्ती सर्वत्र पसरतच होती .विठ्ठलभक्त अनवेकर या नावानेच सगळेजन त्यांना ओळखत होते.एका आषाढीला पंढरपूरी चिक्कार गर्दी भरली होती .अशातचं कुठूनशी एक वृध्द आजीबाई म्हातारी पण वारीला आली होती .देवळात दर्शनाला गेली .हातात एक नारळ घेऊन .पण गर्दीत काही तिला प्रवेश मिळाला नाही ,ती पश्चात्तप करु लागली ,' मी दुर्देवी ,मला कुठलं दर्शन व्हायला ? आयुष्यात अनेक दोष घडले काही सत्कार्य केले नाही त्यामुळेचं देव दर्शन देत नसेल. अशा खिन्न अंत:करणानं बसली ,एक वारकरी जवळ आला आणि म्हणाला,'म्हातारे, इथं तुला देव भेटायचा नाही . अग संत देवापेक्षाही श्रेष्ठ असतात.पंढरपूरात असाचं एक देवाचा लाडका भक्त आहे ,तु तिथं जा ! म्हातारी पू.दादामहाराजांच्या दर्शना करिता निघाली पोहचली तर तिथंही गर्दी होती , तिथं ही दर्शन झालं नाही .. पुन्हा ती मंदिरात आली तेव्हा तिनं दर्शन घेतलं आणि देवाच्या कमरेजवळ नारळ ठेवला आणि निघून गेली..काही वेळाने सेवेधारी मंडळींनी नारळ काढायचा प्रयत्न केला पण व्यर्थ गेला, ...त्या रात्री पुजा-यांना दृष्टांत झाला हा नारळ तुमचाही नाही अन् माझाही नाही हा नारळ माझ्या लाडक्या विठोबा दादा चातुर्मास्ये यांचा आहे ,त्यांच्या शिवाय कोणाला मिळणार नाही त्यांना घेऊन या. पुजारी शोध घेत वाड्यात आले आणि दादांना मंदिरात घेऊन आले .दादांनी पदर पसरला आणि विनविले , ' देवा ! तोच मी असेल तर कृपा करा ' आणि काय नवल ! नारळ चटकन त्यांच्या पदरात पडला . लोक आणि पुजारी चकीत झाले..
मोठ्याने गर्जना झाली . " सद्गुरु विठोबा दादामहाराज की जय "
सर्वत्र तेव्हापासून विठोबा दादा चातुर्मास्ये हे नाव सर्वतोमुखी झाले .. चातुर्मास  झाल्यानंतर गावोंगावो 'पिटु भक्तीचा डागोंरा' म्हणत मराठवाडा, विर्दभ संपूर्ण महाराष्ट्रभर तसेच मध्यप्रदेश आदी भागात भागवत धर्माचा प्रचार-प्रसार केला ...
पुढे पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांनी आपले महेश्वर नगरीस त्यांना गौरवानं नेलं तिथंही खूप मोठा उत्सव झाला.आर्याकार महाराष्ट्रकवि मोरोंपंत यांचा आणि पू.महाराजांचा स्नेह होता , मोरोंपंतानी कोणतेही काव्य केलं कि महाराजांना दाखवत आणि मगचं प्रकाशित करत..
३६ वर्ष चातुरमास सेवा झाल्यानंतर महाराजांनी श्रीक्षेत्र अनवा ता.भोकरदन ( आज हि तिथं समाधी आहे. ) येथे समाधी घेतली . महाराजांच्या बहिन जिजाईनां खूप दु:ख झाले .जिजाई म्हणताात. 'सगळं जगचं नश्वर आहे .त्याचा मला शोक नाही . माझा दादाही कधी ना कधी अंतरणार होताच पण त्याने पंढरीमध्ये देह ठेवला असता तर मला फार बरं वाटलं असतं. चित्तेची सर्व तयारी पूर्ण झाली . आता देह ठेवायचा, एवढ्यात महाराजच मंद हसत उठले आणि जिजाईनां जवळ बोलवलं अन् म्हणाले, ' तुला दु:खी करणं अशक्य आहे.तुझी इच्छा पूर्ण करु .....
पुढे चातुर्मासात महाराजांनी विचार करुन श्रावण वद्य त्रयोदशी हा दिवस निवडला ..
त्रयोदशी उजाडली. ..  महाराजांनी स्नानादि नित्य कर्म उरकून पांडूरंगाचं दर्शन घेतलं आणि सकाळीचं कीर्तन प्रारंभ केला ..सर्वाचा निरोप घेतला आणि आसनावर बसले , सगळे भक्त सभोवती होतेचं . बाबा पाध्ये ,आर्याकार मोरोंपंत , आहिल्याबाई होळकर..
श्रावण वद्य त्रयोदशी ,शनिवार पुष्प नक्षत्र अभिजित योग .. या दिवशी मध्यान्ह शिगेला आली .महाराजांनी शांतपणे हात जोडले 'श्रीविठ्ठल ' म्हणाले आणि शांत झाले....अंतयात्रा , नगर प्रदक्षिणा झाली ..चंद्रभागेवर आली .मलयागिरी चंदणाची चिता रचली ..श्रीविठ्ठल नामजप सुरु होताचं ...पुंडलिक वरदाच्या गर्जनेत महाराजांचे चिरंजीव पू. मैराळ महाराज यांनी अग्नी दिला....

     सुमारे  २७० वर्षांपासून  चातुर्मास कीर्तनसेवा अव्याहत पणे सुरु आहे.. सध्या गादीवर प.पू.श्रीगुरु ज्ञानेश्वर महाराज चातुर्मास्ये अनवेकर हे सद्गुरु विठोबा दादामहाराजांचे ११ वे वंशज आहेत....
पुण्यतिथि निमित्त पू. महाराजांच्या चरणी कोटी कोटी दंडवत. ....

-  श्रीगुरुसेवक
पुष्कराज उर्फ राज तुकाराम महाराज चातुर्मास्ये

1 टिप्पणी: